सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक निम्बर्गी यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

0
25

सोलापुरात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला लागल्याने भाजप गोटात अस्वस्थता पसरली आहे. सोलापुरात उत्तर मतदारसंघात व दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही आमदारांचे आडनांव देशमुख आहे. या दोन्ही देशमुखांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून भाजप पक्ष सोडत असल्याचं सांगत प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

सोलापुरात भाजपमध्ये दोन आमदार देशमुखांमधील अंतर्गत वादामुळे कंटाळलो होतो. फेब्रुवारी २०१७ मध्ये सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली होती. सत्ता आल्यापासून सोलापूरच्यया भाजपमध्ये दोन देशमुख गट निर्माण झाले. याचा फटका सोलापूरच्या विकासावर झाला अशी खंत यावेळी प्रा. अशोक निंबर्गी यांनी व्यासपीठावर असताना व्यक्त केली.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘कमळ’ सोडून त्यांनी आता काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतल्याने सोलापुरात एकच चर्चा होती. अशोक निंबर्गी यांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केला होता.