सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ निलंबित

0
386

सोलापूर : विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील नागेश आर्केस्ट्रा बार वर दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ प्रीती टीपरे विभाग-२ यांच्या मार्फत छापा टाकण्यात आला होता. त्यावेळेस विजापूर नाका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ व इतर कर्मचारी यांना मदतीसाठी बोलविण्यात आले होते. घटनास्थळी सपोनि कोल्हाळ आल्यानंतर सपोआ विभाग-२ यांनी त्यांना सदर घटनास्थळाचा जप्ती पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार त्यांनी सदर घटनास्थळी जप्ती पंचनामा केला. परंतू त्यामध्ये जेणेकरून निष्पन्न होणाऱ्या जवळपास २० ते २५ आरोपी यांना फायदा व्हावा या उद्देशाने जाणीवपूर्वक उणीवा ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली व पुनःश्च विचारणा केली असता काही एक उत्तर न देता व कोणासही काहीही न सांगता ते रुग्णता रजेवर गेले आहेत. तसेच त्यांच्याकडे यापूर्वीचे एकूण १८ गुन्हे प्रलंबित आहेत. त्यापैकी भादंवि ४२० (फसवणुक) चे ०६ गुन्हे, भादंवि ३९२ (जबरी चोरी च ०४ गुन्हे भादंवि ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३५४ (विनयभंग) व ३६३ (अपहरण) चे असे प्रत्येको ०१ गुन्हा प्रलंबित आहे व असे महत्वाचे प्रलंबित गुन्हे कोणाकडेही तपासासाठी हस्तांतरीत न करता स्वतःच्या गैरकायदेशीर ताब्यात ठेवले. जेव्हा की, गंभीर गुन्ह्याचा तपास मुदतीत निर्गती होणे आवश्यक असते. या गंभीर कसुरीमुळे सपोनि शितलकुमार कोल्हाळ यांना दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशानुसार शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.