येस न्युज मराठी नेटवर्क : शिक्षणाची दशसुत्री उपक्रमांतर्गत आज माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सीईओ स्वामी हे जिल्हाभर फिरून या अभियानासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेत आहेत. आज अकलूज येथे माळशिरस तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत बोलताना सीईओ स्वामी यांनी सायकल बॅंक हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातून सुरू झाला आणि आज त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील अकरा तालुक्यात सुरू झाली आहे. दानशूर नागरिक या उपक्रमात आपापल्या परीने योगदान देत आहेत त्यामुळे आज जिल्हाभरात पाचशेच्या वर सायकली सायकल बॅंकेस प्राप्त झालेल्या आहेत. केवळ शाळा लांब आहे आणि सायकल घेण्यासाठी परिस्थिती नाही म्हणून आपल्या जिल्ह्यातील अनेक मुली शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत होते. ही बाब लक्षात घेऊन मी सायकल बॅंकेची संकल्पना मांडली आणि ती बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहे. या चांगल्या कामात माझे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सहभाग नोंदविला तर मला आनंद होईल असे आवाहन केले.
त्याचप्रमाणे सायकल भेट बहिणीसाठी या नव्या उपक्रमाची सुरुवात यावेळी सीईओ स्वामी यांनी केली.याला प्रतिसाद म्हणून कार्यशाळा संपताच माळशिरस तालुक्यातील खडकमल शाळेचे मुख्याध्यापक श्री दिंगबर गायकवाड यांनी सायकल बॅंक उपक्रमासाठी भेट म्हणून दीड लाख रुपयाचा चेक सीईओ स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्याध्यापकाच्या या दातृत्व भावनेचे सीईओ स्वामी यांनी कौतुक करुन दिगंबर गायकवाड यांचा सत्कार केला. या प्रसंगी बोलताना गायकवाड म्हणाले की माझ्या बहिणींच्या शिक्षणासाठी मी ही मदत केली आहे. सीईओ स्वामी यांनी हा दिड लाखाचा चेक तातडीने गटशिक्षणाधिकारी देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, गटशिक्षणाधिकारी देशमुख, विस्तार अधिकारी गुरव, हरीश राऊत आदी उपस्थित होते.