तब्बल ७०० महिलांना घडवली मोफत श्रीशैलम् यात्रा; श्रावण महिन्यानिमित्त होनराव यांचा उपक्रम

0
21

सोलापूर : श्रावण महिन्यानिमित्त तब्बल ७०० महिला भगिनींना मोफत श्रीशैलम् यात्रा घडविण्याचा कौतुकास्पद उपक्रम कुंभारी येथील उद्योजक गजानन होनराव आणि रामचंद्र होनराव कुटुंबियांनी केला. ७०० महिला भगिनींचा जत्था शुक्रवारी सोलापुरातून श्रीशैलम् ला रवाना झाला.

प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली. यानंतर होम मैदान येथे एम. के. फौंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे आणि वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांच्या हस्ते यात्रेतील ६० वाहनांची पूजा करण्यात आली. यानंतर अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी मंदिरात काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते पूजा आणि आशीर्वचन झाले.

श्रावण महिन्यामध्ये भारतभरातील ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही. ही अडचण ओळखून गजानन होनराव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात कृष्णा नदीच्या काठावरील श्रीशैलम पर्वतावर स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे. आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर “दक्षिणेचे कैलास” म्हणूनही ओळखले जाते आणि हे भगवान शिवशंकराच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, असे होनराव यांनी सांगितले.

महिला भगिनींच्या समवेत डॉक्टरही राहणार आहेत. या सर्व ७०० महिलांच्या ४ दिवसांच्या प्रवास, भोजन आणि निवासाची सोय होनराव कुटुंबियांतर्फे करण्यात आली आहे.

याप्रसंगी संयोजक गजानन होनराव, रामचंद्र होनराव, प्रकाश करपे, माजी पंचायत समिती सदस्य सागर तेली, इरेश कटारे, केदार छपेकर, महेश खसगे, उमेश पारशेट्टी, अप्पू गाडेकर, सचिन झगळगंटे, स्वप्निल थोंटे, रेवणसिद्ध आवजे, सोमशेखर करजोळे, बाबुशा गाडेकर, राजेंद्र गंगरे आदी उपस्थित होते.

कोट

भगवान शिवशंकराची सेवा घडली याचे समाधान
सर्वच भाविकांना श्रीशैलम् चे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची अडचण सोडविण्यासाठी श्रावण महिन्यानिमित्त मोफत श्रीशैलम् यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्याचे समाधान आहे.
— गजानन होनराव