विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सात ते 18 डिसेंबर या कालावधीत नागपुरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आपली लक्षवेधी लागू नये…लागलीच तर त्यातून बचाव करता यावा याचे प्रयत्न सर्वांनी सुरू केले आहेत. सोलापुरातील अवैध धंदे गेल्या अधिवेशनात चांगलेच गाजले. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांनीच यावर आवाज उठवला. शिवाय राष्ट्रवादीचे सुहास कदम यांनी अवैधं धंद्याविरोधात उपोषण देखील केले. त्यामुळे सोलापूरची राज्यभर बदनामी झाली होती. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात पुन्हा हे विषय येऊ नये यासाठी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी क्राईम मीटिंगमध्ये सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तसेच पोलीस निरीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत.
सध्या बहुतांश अवैध धंदे बंद केल्याचा दावा पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षकांनी आपल्या हद्दीतील सर्व दुकाने हॉटेल बंद झाल्यानंतरच घरी जावे… शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले आहे. शहरात क्यू आर कोड पेट्रोलिंग वाढवावे…वाहतूक व्यवस्थेवर लक्ष द्यावे.. रात्री बारानंतर पहाटे साडेचार वाजेपर्यंत गस्त घालावी…आपल्या हद्दीत कोणतेही अवैध धंदा सुरू राहणार नाही याची दक्षता घ्यावी.. आंदोलने,मोर्चा,निवेदने याकडे लक्ष ठेवावे अशा सूचना देखील पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.










