जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.









