पक्षाच्या भूमिकेशी वैचारिक मतभेद; सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी सोडले पद
येस न्यूज मराठी: डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या निर्णयाला विरोध करत पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी विसंगत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
खामकर यांनी आपल्या पत्रात पक्षाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय सोयीसाठी वारंवार बदलणाऱ्या भूमिका आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा होणारा अनादर याचा निषेध करत, पक्षाच्या निर्णयामुळे जनतेसमोर कोणती भूमिका मांडायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘पदापेक्षा विचार, सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा’ अशी भूमिका मांडत त्यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. पक्षाने सत्ताधारी भाजपच्या निर्णयांचे समर्थन करायचे की पुरोगामी विचारांची कास धरायची, हा पक्षाचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पदावर असो वा नसो, संविधान, लोकशाही आणि पुरोगामी विचारांच्या रक्षणासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही खामकर यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले.
डिलिमिटेशन विधेयकावर पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, या मुद्द्यावरून आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.











