येस न्यूज मराठी: देशातील सर्वाधिक लोकप्रिय पॅकबंद पिण्याच्या पाण्याच्या ब्रँडपैकी एक असलेल्या Bisleri ला मोठा धक्का बसला आहे. कंपनीच्या पॅकबंद पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीत दोन वेळा अपयशी ठरल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तपासणीदरम्यान कर्करोगाशी संबंधित घातक घटक आढळल्याने अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कंपनीविरोधात न्यायालयीन खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, बिसलेरीच्या पॅकबंद पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. प्रयोगशाळेतील पहिल्या तपासणीत हे नमुने निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार योग्य नसल्याचे आढळले. त्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. मात्र, दुसऱ्यांदाही नमुने अपयशी ठरल्याचे समोर आले.
या तपासणीदरम्यान कर्करोगाच्या धोक्याशी संबंधित घटक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
या निष्कर्षांच्या आधारे FSSAI ने कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता बिसलेरीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रकार समोर आल्याने बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, अन्न सुरक्षा यंत्रणेच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











