प्रिसिजन गप्पांच्या दुसऱ्या दिवशी संस्मरणीय ठरले हिंदी सिनेमातील गाणी आणि किस्से : डॉ. मृदुला दाढे – जोशी यांच्या सादरीकरणाला सोलापूरकरांची तुडुंब गर्दी
सोलापूर : अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या अर्थातील गोडवा, श्रवणीयता अन उत्तमोत्तम भारतीय संगीतकारांनी पडद्यावरील प्रसंग, व्याकरण, शब्दांचे अर्थ यांचा प्रचंड अभ्यास करून गीतांना लावलेल्या चालींचे स्वरमाधुर्य उलगडत डॉ. मृदुला दाढे – जोशी यांनी केलेल्या सादरीकरणामुळे रसिकांना हिंदी चित्रपट गीतांच्या मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन शनिवारी घडले. सोबतच विविध प्रकारचे किस्से आणि हिंदी सिनेमातील गीतांनी सोलापूरकरांना हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळाच्या आठवणींत नेले. निमित्त होते प्रिसिजन फाउंडेशनतर्फे हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित प्रिसिजन गप्पा या सांस्कृतिक सोहळ्याचे.
प्रिसिजन गप्पा च्या दुसऱ्या दिवशी प्रख्यात संगीत अभ्यासक आणि गायिका डॉ. मृदुला दाढे – जोशी यांचा ‘रहे ना रहे हम’ हा हिंदी संगीतकारांची गाणी आणि गप्पांचा कार्यक्रम झाला. हिंदी संगीताचा जणू चालता बोलता संदर्भ ग्रंथ असलेल्या डॉ. मृदुला दाढे – जोशी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचन आणि गीत सादरीकरणातून या सांगीतिक अन गप्पांच्या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
प्रारंभी प्रिसिजन कॅमशाफ्टचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन कॅमशाफ्टचे कार्यकारी संचालक करण शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयुरा दावडा – शहा आणि सहकाऱ्यांच्या हस्ते गायक, सहगायक आणि वादकांचा सन्मान करण्यात आला. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. मृदुला दाढे – जोशी यांना संवादक अभिजीत कुलकर्णी यांनी हिंदी सिनेमातील गाणी आणि घटनांवर बोलते केले. या कार्यक्रमात डॉ. मृदुला दाढे – जोशी यांनी हिंदी चित्रपटातील गाजलेली आणि रसिकांना अत्यंत भावणारी लोकप्रिय गाणी आपल्या खास शैलीत सादर केली. ‘आयेगा, आयेगा आनेवाला’, ‘ये जिंदगी उसी की है जो किसीका हो गया’, ‘गोरे गोरे’, ‘चलते चलते’ अशी अत्यंत मधुर चालींतील गाणी सादर करून रसिकांना सुरांवर डोलायला लावले. तर सहगायक निलेश निरगुडकर यांनी तुम्हारे ‘जुल्फ के साये में’, ‘चौदवी का चांद’, ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये’ अशी गीते सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. अभिजीत कुलकर्णी यांच्या बहारदार संवादाने कार्यक्रमात आणखीनच रंग भरला.
डॉ. मृदुला दाढे – जोशी यांनी संगीतकार खेमचंद प्रकाश, सी. रामचंद्र, मदन मोहन, रविशंकर शर्मा अशा महान कलाकृती निर्माण करणाऱ्या अनेक संगीतकारांच्या कलाकृतींमधील बारकावे दाखवून देत रसिकांना त्याच गाण्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. संगीतकारांबरोबरच लता मंगेशकर, महंमद रफी यांच्या सारख्या गायकांनी गाण्याची उंची वाढविण्यासाठी कशाप्रकारे जीव ओतून ते गायले याचे बारकावे सांगितले. गाण्यांतील सूर, जागा, हरकती, मुरकी, ताना म्हणजे गाण्याचे सौंदर्य असते. मोरपीसातील प्रत्येक धागा वेगळा असतो. पण ते एकत्र आले की सुंदर मोरपीस बनते. अगदी त्याचप्रमाणे गाणे म्हणजे तरल मोरपीसासारखे असते, असा दाखला डॉ. मृदुला दाढे – जोशी यांनी देताच सोलापूरकरांनी प्रचंड टाळ्यांची दाद त्यांना दिली.
गायकांना कीबोर्डवर केदार परांजपे, तबल्यावर ऋषिराज साळवी, हँडसॉनीकवर दिगंबर मानकर तर साईड रिदमवर व्यंकटेश कुलकर्णी यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाची सहनिर्मिती उदय मटकर यांची होती.




डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गायनाने आज प्रिसिजन गप्पांचा समारोप
विख्यात संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘कवितेचं गाणं होताना’ या कार्यक्रमाने रविवारी प्रिसिजन गप्पांचा समारोप होणार आहे. त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव शुभंकर कुलकर्णी आणि सन्मिता धापटे हे सहगायन करणार आहेत. या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले आहे.











