महाराष्ट्रातील ऊसदराचा तिढा कायम; कर्नाटकातील कारखान्यांकडून ३,७०० ते ३,७११ रुपये प्रतिटन दर जाहीर
येस न्यूज मराठी : महाराष्ट्रातील ऊसदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकातील साखर कारखान्यांकडे ऊस पाठवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ऊसदराचा अंतिम निर्णय होत नसताना कर्नाटकातील कारखान्यांनी ३,७०० ते ३,७११ रुपये प्रतिटन दर जाहीर केल्याने सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा कल कर्नाटकाकडे वाढत आहे.
विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हिनाळ येथील श्रीदत्त साखर कारखान्याने ३,७११ रुपये, तर इंडी तालुक्यातील धुळखेड येथील भीमाशंकर साखर कारखान्याने ३,७०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांच्या तुलनेत हे दर अधिक असल्याने सीमावर्ती भागातील शेतकरी कर्नाटकातील कारखान्यांना ऊस पाठवण्यास प्राधान्य देत आहेत.
दरम्यान, भीमा आणि सीना या दोन्ही नद्या आटल्याने तसेच विंधनविहिरींची पाणीपातळी खालावल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. उभा ऊस जगवणेही कठीण होत असून, ऊस लवकर गाळपाला जावा आणि त्याला योग्य दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
एकीकडे महाराष्ट्रात ऊसदरासाठी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सीमावर्ती भागातील ऊस कर्नाटकात जात असल्याने राज्यातील साखर कारखानदारांसमोरही ऊस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ऊसदराचा तिढा लवकर सुटणार का, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.










