आजअखेर ३०० कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे वाटप; उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मिळणार लाभ
सोलापूर : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम आर्थिक मदतीचे वाटप सुरू आहे. जिल्ह्यात आजअखेर ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ३०० कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवरही मदत निधी जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश आहे.
दुष्काळामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीचे पीकवर्गवारीनिहाय व क्षेत्रनिहाय निकष अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असताना, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीचा आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या निर्णयाला २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी पाच हजार रुपये अग्रीम स्वरूपात देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.










