१०० इलेक्ट्रिक बसेसचे स्वप्न; पहिल्या टप्प्यात १८ रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे चित्र बदलण्याची संधी
येस न्यूज नेटवर्क : सोलापूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १८ वातानुकूलित ई-बसेस सुरू झाल्याने सोलापूरच्या वाहतूक व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. मात्र, हा केवळ बससेवेचा शुभारंभ नसून शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याची मोठी संधी आहे.
प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेंतर्गत सोलापूरला १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील बसेस शहरातील ९ आणि ग्रामीण भागातील ७ अशा एकूण १६ मार्गांवर धावणार आहेत.
खासगी वाहनांना पर्याय मिळणार?
शहरात दुचाकी आणि खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न आणि प्रदूषण या समस्या गंभीर होत आहेत. नियमित, वेळेवर आणि परवडणारी बससेवा उपलब्ध झाली तर नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दहा रुपयांत एसी प्रवास!
किमान १० रुपये तिकीट दरात वातानुकूलित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणे ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाची बाब आहे. मात्र, बसची वारंवारता, वेळापत्रक आणि मार्गांचे योग्य नियोजन यावरच या सेवेचे यश अवलंबून राहणार आहे.
ग्रामीण भागालाही जोड मिळणार
शहराबरोबर ग्रामीण भागातील सात मार्गांवर ई-बसेस धावणार असल्याने शहराशी संपर्क वाढण्यास मदत होईल. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी सोलापुरात येणाऱ्या ग्रामीण प्रवाशांना याचा फायदा होऊ शकतो.
खरी परीक्षा व्यवस्थापनाची!
ई-बसेस सुरू करणे ही पहिली पायरी आहे. त्यानंतर नियमित देखभाल, चार्जिंग व्यवस्था, चालक-वाहकांची उपलब्धता, वेळापत्रकाचे पालन आणि प्रवाशांना चांगली सेवा देणे ही महापालिकेसमोरील खरी आव्हाने असतील.











