सोलापूर,: ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी ऊसतोड कामगारांसोबत बसून दिवाळीचा फराळ घेतला. कामगारांना दिवाळीनिमित्त फराळ व आहेर भेट दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने महिलांना भाऊबीजेची भेट देण्यात आली. या भेटीमुळे कामगारांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाची माहिती घेतली. ऊसतोड कामगारांची मुले प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असून, त्यांची शाळा मूळ गावी असल्यामुळे स्थलांतराच्या काळात त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने या मुलांना त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणीच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजच जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबत पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीनिमित्त ऊसतोड कामगारांना फराळ आणि लहान मुलांना कपडे यांचेही वाटप करण्यात आले. कामगारांच्या पालावर दिवाळी साजरी करताना त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री व सर्व उपस्थित मान्यवर यांनी ऊसतोड कामगार सोबत दिवाळीचा फराळ ही घेतला. व त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. हे सर्व ऊसतोड कामगार मराठवाडा, विदर्भ व नंदुरबार येथून येथे आलेले आहेत.
यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.










