२५ नोव्हेंबरपर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या जिल्हा परिषद सेस (DBT) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी यंत्रसामग्री व कृषी अवजारे ५० टक्के किंवा निर्धारित मर्यादेत अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत पीक संरक्षणासाठी पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, कृषी अभियांत्रिकीअंतर्गत रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, सिंचनासाठी ५ एचपी सबमर्सिबल विद्युत पंप संच, डिझेल इंजिन तसेच कडबाकुट्टी, ताडपत्री व स्लरी फिल्टर या साहित्याचा समावेश आहे.
सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक, दिव्यांग व महिला शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आठ-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करावी. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी जात प्रमाणपत्र, तर दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांची निवड कृषी समितीमार्फत करण्यात येणार असून, निवड झाल्यानंतर एका महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून पसंतीच्या कृषी औजाराची खरेदी करावी लागेल. खरेदी करण्यात येणारी यंत्रसामग्री अधिकृत सक्षम तपासणी संस्थेने तपासलेली तसेच बीआयएस किंवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणक व तांत्रिक निकषांनुसार असणे बंधनकारक आहे.
मंजूर कृषी औजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपल्या संबंधित पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागाकडे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे.











