उजनी धरणावर जेडब्ल्यू ग्लोबल ग्रुपच्या माध्यमातून आणि विविध अशा पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून एक लाख 13 हजार कोटी रुपयांचे ए आय डेटा सेंटर 2031 पर्यंत केले जाणार आहे. 2028 पर्यंत पाचशे मेगा व्हॅट तर 2031 पर्यंत चौदाशे मेगा वॅट क्षमतेचे ए आय डेटा सेंटर उभारले जाणार आहे. जलसंपदा विभागाने 538 एकर जागा सोलर पार्क साठी एमआयडीसीला दिली असून एमआयडीसी कडून या जागेचे सीड या कंपनीकडे 49 वर्षाकरिता हस्तांतरण केले आहे. ही जागा नेमकी कोणती हे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. ३३६३० हेक्टर एवढे उजनी जलाशयाचे पूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्र आहे. त्यापैकी नऊ टक्के म्हणजे 3000 हेक्टर पृष्ठभागावर हे तरंगते सौर पॅनल उभारले जाणार आहेत. यातून वर्षाकाठी 350 कोटी युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. बाष्पीभवनाच्या माध्यमातून 16 टीएमसी पाणी उन्हामुळे उडून जाते,सोलर पार्कमुळे दोन टीएमसी पाणी वाचेल असा दावा करण्यात येत आहे. शिवाय हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 2800 युवकांना थेट नोकरी तर चाळीस हजार लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. याच प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर भिडले आहेत.









