सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे. या डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघू लागले आहे. आजी माझी आमदारांनी डीसीसी बँकेच्या माध्यमातून आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मुलासह आपले देखील अर्ज डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी भरले आहेत. 516 अर्जांची विक्री झाली असून गुरुवारपर्यंत 69 जणांनी अर्ज भरले होते. आजवर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे, जयवंतराव जगताप, बबनराव शिंदे यांनी आपल्या मुलांसह डीसीसी बँकेच्या विविध मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक अमोल शिंदे, शहाजी पवार, सुरेश हसापुरे यांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या चिरंजीवांनी अर्ज भरला असून ते आज अर्ज भरणार आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे,जिल्हा परिषदेच्या रश्मी बागल हे देखील आज अर्ज दाखल करणार आहेत. मोहिते पाटील आणि परिचारक गटाचे अर्ज आज दाखल होणार आहेत. आज मोठ्या प्रमाणावर दाखल अर्ज होतील तर उद्या आणि परवा खूप मोठ्या राजकीय घडामोडी होऊन पॅनल निश्चित होणार आहेत. सोमवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी या बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे.










