राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ५,००० रुपयांची तात्काळ अग्रिम मदत थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून ७,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्या सर्वांना सरसकट 5000 रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र सुरुवातीला काढलेल्या शासन निर्णयात मंत्री ,खासदार ,आमदार, सरकारी कर्मचारी ,प्राप्ती करदाते व निवृत्तीवेतनधारकांना या मदतीने वगळण्यात आले होते. या अटींमुळे मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला होता व प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच ॲग्रीस्टॅक प्रणालीत अपात्र व्यक्तींची छाननी करण्यात मोठा प्रशासकीय विलंब लागण्याची शक्यता होती . त्यामुळे जाचक अटी रद्द करून सरसकट पाच हजार रुपये जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामुळे मूळ निर्णयात सुधारणा करत,संबंधित अटी रद्द केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व बाधित शेतकरी आता सरसकट पाच हजार रुपयांच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत .दिवाळीच्या तोंडावर ही रक्कम त्यांच्या बॅक खात्यात जमा होणार आहे.











