महाडीबीटी २.० प्रणालीवर नवीन व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
सोलापूर : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी २.० प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज तात्काळ भरून घेऊन मंजुरीसाठी सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी महाविद्यालयांनी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांचे नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अर्ज महाडीबीटी २.० प्रणालीवर तातडीने भरून घ्यावेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून महाविद्यालयीन स्तरावरील कार्यवाही पूर्ण करावी आणि पात्र अर्ज पुढील मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप भरलेले नाहीत किंवा अर्जांमध्ये त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांशी महाविद्यालयांनी त्वरित संपर्क साधून अर्ज पूर्ण करून घ्यावेत. कोणताही पात्र विद्यार्थी आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे किंवा अर्जातील त्रुटींमुळे शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
तरी, सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या बाबीस सर्वोच्च प्राधान्य देऊन अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी २.० प्रणालीवर तात्काळ भरून घेऊन मंजुरीसाठी सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.











