सोलापूर शहरात दररोज उजनी धरण तसेच हिप्परगा तलावातून एकूण 208 एम एल डी एवढे प्रचंड पाणी उचलले जाते. मात्र पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे काही भागात पाण्याची प्रचंड नासाडी सुरू आहे. काही भागात चार दिवसात तर काही भागात पाच दिवसात पाणीपुरवठा केला जातो. काल सायंकाळी सोलापूर शहरातील नवी पेठ, चौपाड, नवजवान गल्ली, काळी मज्जिद, मोबाईल गल्ली या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर महापालिकेने पाणीपुरवठा केल्यामुळे रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी वाहत होते. अनेक नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना तसेच माध्यमांना देखील फोनवरती याची माहिती दिली. पुन्हा बुधवारी सकाळी तोच कित्ता गिरवण्यात आला.
बाबा कादरी मज्जिद, चौपाड बालाजी मंदिर, चौपाड जुने पोस्ट ऑफिस, विठ्ठल मंदिर,शिंदे चौक या भागातील रस्त्यावरून देखील सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी वाहत होते. एकीकडे दुष्काळा निमित्त पाण्याचा काटकसरीने वापर करा, पाण्याचा अपव्य टाळा असे मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे आदेश असताना सोलापूर महापालिकेतील पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांच्या गलथांपणामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी सुरू आहे. पाण्याची नासाडी करणाऱ्या शहरवासीयांना दंडात्मक कारवाई महापालिकेने सुरू केली आहे आणि दुसरीकडे महापालिकेचे अधिकारीच दुष्काळामध्ये असं कोठ्यावधी लिटर पाणी वाया घालवतात त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न सातत्याने नागरिक विचारत आहेत.










