धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक ! ‘या’ निवडणुकीतून हुकूमशाहीला धडा शिकवण्याची सुवर्णसंधी
अकलूज : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सक्षम असून हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सत्तेच्या मस्तीत चूर असलेल्या या मनमानी आणि हुकूमशाही सरकारला आता ताळ्यावर आणण्याची वेळ आली असून, सुशिक्षित तरुणांनी निर्भीडपणे पुढे येत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून या भ्रष्ट सरकारला धडा शिकवावा, असा खणखणीत इशारा दिला.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते तुफान फटकेबाजी करत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर, मदनसिंह मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या राज्यात तब्बल अकरा हजार शिक्षकांची पदे रिक्त असताना सरकार डोळे झाकून बसले आहे, अशी तोफ खासदार मोहिते-पाटील यांनी डागली. ते म्हणाले की, माळशिरस आणि परिसरामध्ये ऊस, डाळिंब, केळी यांसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणावर होतात; मात्र या पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या उपपदार्थ उद्योगांची निर्मिती करून तरुणांना स्थानिक स्तरावर उद्योजक बनवण्यासाठी हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आगामी काळात निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनी या ज्वलंत मुद्द्यांवर विधिमंडळात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी बोलताना पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. “प्रत्येक पदवीधरांच्या समस्या वेगवेगळ्या असून, हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर मजबूत व्यवस्था उभारणे काळाची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या. कौशल्याधारित व व्यवसायाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी हे सरकार शिक्षण संस्थांना टाळे ठोकण्याचे उद्योग करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पदवीधरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात रोजगार व मार्गदर्शन केंद्र उभारणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या मेळाव्यात माजी आमदार रामहरी रुपनवर, ॲड. प्रकाश पाटील आणि शीतलदेवी मोहिते-पाटील यांनीही आपल्या परखड भाषणांतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ मगर यांनी केले. महाविकास आघाडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे अकलूजमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र लाट उसळल्याचे चित्र या मेळाव्यातून दिसून आले..
“विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना या निवडणुकीच्या निकालातून त्यांची योग्य औकात दाखवून द्या!” खासदार धैर्यशील मोहिते-पाटील










