सोलापूर: पुणे विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित देशी-विदेशी मद्यविक्री आणि ताडी विक्री अनुज्ञप्ती निर्धारित कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने पुणे विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-सी तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश देण्यात आले आहेत.
मद्यविक्री बंदीचा कालावधी पुढीलप्रमाणे :
दि .२१ ऑक्टोबर २०२६ : दुपारी ४ वाजल्यापासून मद्यविक्री बंद राहील तसेच २२ ऑक्टोबर २०२६ : संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहील. दि – २३ ऑक्टोबर २०२६ : मतदानाच्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहील.
ही बंदी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लागू राहणार आहे. देशी व विदेशी मद्याची घाऊक व किरकोळ विक्री तसेच ताडी विक्रीशी संबंधित सर्व संबंधित अनुज्ञप्त्यांना हे आदेश लागू आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ५४ व ५६ मधील तरतुदींनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईही करण्यात येऊ शकते. असे आदेश जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी दिले आहेत.










