जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ, बाळे आणि शारदा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बाळे, ता. उत्तर सोलापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदानातून संकलित होणाऱ्या रक्ताचा गरजू रुग्णांना फायदा होणार असून, या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होईल.
या रक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिद्धाराम कल्याणकर , दिलीप बटाणे , अंबादास विभूते राहुल तोडकरी, किशोर बारडोळे, विमलाबाई जामगुंडे, शिवकांता कल्याणकर यांच्या उपस्थितीत लाभली..सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्याचा मंडळाचा हा प्रयत्न असून, बाळे गावात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या दृष्टीने अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित होते. जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ आणि शारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला. यासाठी मंडळाचे आधारस्तंभ गंगाधर कल्याणकर, अध्यक्ष मेघराज कल्याणकर, खजिनदार राहुल विभुते,संदेश मोकळे,संदीप कल्लूरकर ,यशवंत म्हमाणे,सुमित बारडोळे यांनी परिश्रम घेतले.















