येस न्यूज नेटवर्क: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात आज, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या अपडेटनुसार ९४.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी सुमारे ३५ टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी प्राधान्याने राखीव ठेवण्यात येईल आणि उर्वरित पाण्याचे शेतकऱ्यांसाठी नियोजन केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान दिली होती.
आज सकाळच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणीपातळी ४९६.८१ मीटर असून धरणाची पूर्ण जलसाठा पातळी ४९७.५८ मीटर आहे. धरणात १४३७.३० दलघमी जिवंत साठा असून एकूण साठा ३२४०.१३ दलघमी इतका आहे. धरणाची एकूण क्षमता ३४९१.२१ दलघमी आहे. सध्या धरण ९४.७३टक्के भरले असून काल पेक्षा पाणीसाठ्यात अल्प प्रमाणात घट झाली आहे. धरणात आवक सुरू असली तरी कालवा आणि बोगद्यातून पाणी सुरू असल्याने ही घट दिसून येत आहे.
उजनी धरण जवळपास भरले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील ९५ महसूल मंडलांपैकी ५३ मंडलांत सप्टेंबरपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सुरू असून पाणी पातळी ९० टक्के येईपर्यंत आवर्तन सुरूच राहणार आहे . दरम्यान ४ ऑक्टोबर पर्यंत परतीच्या पावसाचा अंदाज असून पाऊस पडल्यास धरणावर अवलंबून शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.








