आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी
सोलापूर : ११४ वर्षे पूर्ण झालेल्या ‘श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर’ या ऐतिहासिक आणि नामांकित शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक वास्तूचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावूक वातावरणात पार पडला. शतकोत्तर वाटचाल करत असलेल्या या संस्थेने दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच काळाची पावले ओळखून आपल्या पायाभूत सुविधांचे आधुनिक रूपरेषेत नूतनीकरण केले आहे.
सुंदर इमारतीत प्रशस्त, आकर्षक बेंचसह,पंखे व मोठ्या खिडक्यासह उत्तम वायूविजन, भरपूर प्रकाशासह वर्गखोल्यांची निर्मिती करून प्रत्येक वर्गात ‘स्मार्टबोर्ड’ची सुविधा उपलब्ध करून दिली. अशा या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन प्रिसिजन फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते तसेच श्राविका संस्थेचे सचिव यतिन शहा, विश्वस्त अंजली शहा, करण शहा व देवई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या नव्या इमारतीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे, लख्ख प्रकाश योजनेसह प्रसन्न करणाऱ्या रंगांचा वापर. प्रत्येक मजल्यावर स्वच्छता व सुरक्षिततेचे भान ठेवून तयार केलेले विद्यार्थी व शिक्षकांसाठीचे स्वतंत्र स्वच्छतागृह आणि सुरक्षित क्रीडांगण. शासकीय धोरणांची तंतोतंत अंमलबजावणी करत या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नव्या रूपामुळे विद्यार्थ्यांना काळानुरूप अधिक सुसज्ज, प्रसन्न आणि तंत्रस्नेही वातावरणात आनंददायी शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थीच नव्हे तर पालकही अत्यंत उत्साही असून संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका राखी देशमाने यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यात त्यांनी स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, मूल्यशिक्षण, ध्यान-योग-व्यायाम, भावनिक विकास आणि संस्कार व संस्कृती यांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे कार्य शाळा शतकोत्तरी काळातही अविरतपणे चालू ठेवत असल्याचे सांगितले. या दिमाखदार नूतनीकरण उद्घाटन सोहळ्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, इतर शिक्षण विभागाचे प्रमुख, शिक्षकवृंद, पत्रकार, २०० पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षण अधिक आनंददायी बनविल्याबद्दल यतीन शहा सरांचे आभार मानले व अधिक दर्जेदार शैक्षणिक कामगिरी करण्याचे वचन दिले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सुहासिनी शहा या साऱ्या सोहळ्याने भारावून म्हणाल्या “मातृभाषेतून शिक्षण ही विद्यार्थ्यांची खरी गरज आहे आणि ही गरज फक्त मराठी शाळांतून पूर्ण होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर सुरक्षित व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या तर एक समृद्ध पिढी समृद्ध समाज घडवू शकते. मुलांना शिकण्याच्या विविध तांत्रिक ज्ञानाबरोबर व्यक्त होऊ द्या, त्यांच्या कल्पनांना मूर्त रूप देऊ द्या.”
नवा दृष्टिकोन हाच प्रगतीचा ,विकासाचा मार्ग असतो नव्या नूतनीकरण इमारत व भौतिक सुविधांबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुलांना व शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या पालकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यतीन शहा सर मार्गदर्शन करताना म्हणाले की, नवं काही बदल घडतंय या संकल्पनेसह स्वच्छता, सुरक्षितता, शिस्त, ज्ञान व गुणवत्ता या टप्प्याने या शतकोत्तरी शाळेचा वारसा कालानुरूप समृद्ध करण्याची ही सुरुवात आहे. यापेक्षाही व्यापक व विस्तीर्ण दृष्टिकोन संस्थेचा असून या शिक्षण संस्थेला जागतिक स्तरावर नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
नूतनीकरण वास्तूच्या लोकार्पण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती गांधी, प्रास्ताविक मुख्याध्यापिका राखी देशमाने, पाहुण्यांचा परिचय सुप्रिया सगरशेट्टी तर आभार कीर्ती माने यांनी मानले. याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप ढेरे, रोहन शहा, अरिहंत माणिकशेट्टी व सुरज व्हसाळे या शिक्षकांनी अधिक मेहनत घेतली.













