सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदान केंद्रावर दि. 19, 20, 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन
सोलापूर – निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने 249-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनामार्फत विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत 249-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दि. 19, 20, 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांदरम्यान सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर वेळेत उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, माहितीतील दुरुस्ती तसेच नावे वगळण्याबाबतचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीतील चुकीची नोंद तसेच मयत अथवा स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना क्र. 7 मध्ये अर्ज करता येईल. तसेच मतदार यादीतील नाव, वय, लिंग, नातेसंबंध, पत्ता आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. 8 मध्ये अर्ज करता येईल.
या विशेष शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनीही उपस्थित राहावे, अशा सूचना संबंधित राजकीय पक्षांना देण्यात येणार आहेत. शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती अथवा नाव वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
विशेष शिबिरांची माहिती सर्व प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी तसेच या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष शिबिरांमध्ये महिला व दिव्यांग नागरिकांच्या समावेशनासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. पात्र मतदार मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहू नयेत, तसेच विद्यमान मतदारांच्या नोंदी अद्ययावत व्हाव्यात, यासाठी 249-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या विशेष शिबिरांमध्ये सहभागी होऊन मतदार यादीतील आपल्या नोंदी अद्ययावत कराव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.











