सोलापूर विद्यापीठात ‘सामाजिकशास्त्रांमधील नवे प्रवाह’वर कार्यशाळा
सोलापूर – आजचा समाज वेगाने बदलतो आहे. आर्थिक-तांत्रिक परिवर्तन, डिजिटलता, नव्या धोरणरचना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार या सर्वांचा अभ्यास केल्याशिवाय सामाजिक शास्त्रांचे संशोधन पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे सामाजिक शास्त्रांमध्ये बहुविषयक संशोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणेचे कुलगुरू प्रा. डॉ. उमाकांत दास यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्यावतीने आयोजित ‘सामाजिक शास्त्रांतील नवे प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. दास बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, इतिहास व पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. हाजीमलंग शेख यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
प्रा. दास पुढे म्हणाले, सामाजिक शास्त्रांना आता एका विषयापुरते मर्यादित राहून चालणार नाही. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, डेटा विश्लेषण, लोकधोरणे आणि तंत्रज्ञान यांचा संगम म्हणजे भविष्यातील संशोधनाची खरी दिशा आहे. विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी शास्त्रांची भिंत तोडून नव्या दृष्टीकोनातून समाजाचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टिकोनातूनच सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महनवर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सामाजिक शास्त्रांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढते महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या सामाजिक रचनेच्या पार्श्वभूमीवर संशोधनाची गुणवत्ता आणि संशोधकांची जबाबदारी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. एआय, मशीन लर्निंगच्या युगात सामाजिक शास्त्रांना खूप महत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्यावतीने समाजाच्या विकासावर सतत विविध उपक्रम व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या परिषदेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भास्के यांनी केले तर आभार डॉ. श्रीनिवास भंडारे यांनी मानले.

