सोलापूर महापालिकेने इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियम सह हॉलीबॉल मैदान, खो – खो मैदान.. पार्क स्टेडियम मधील जिम तसेच जलतरण तलाव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला वार्षिक एक लाख रुपयाच्या भाडेतत्त्वावर 29 वर्षासाठी दिला आहे. पाचशे रुपयाच्या बॉण्डवर सोलापूर महापालिका आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यात 4 सप्टेंबर 2025 रोजी नोटरी द्वारे करार करण्यात आला . खरेदीखत, नोटरी, भाडेपट्टाकरार यापैकी काहीही केले तरी त्या जागेच्या मूल्यांकनानुसार मुद्रांक अधिनियमानुसार मूळ जागा मालक किंवा घेणाऱ्या व्यक्तींनी मुद्रांक शुल्क भरला पाहिजे. मनपा प्रशासनातील भूमी मालमत्ता विभागाच्या अति हुशार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आमदार रोहित पवार यांच्या राजकीय दबावापोटी हे करार पत्र करण्यात आले मात्र महापालिका आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोघांपैकी कोणीच मुद्रांक शुल्क भरला नाही. याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी बनसोडे यांनी महापालिकेला खुलासा देखील मागविला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने मुद्रांक शुल्क माफीचा विषय शासन दरबारी पाठवला असल्याचे सांगितले तत्पूर्वीच हा करार केला कसा हे संशयस्पद आहे. या जागेची मालकी महापालिकेची आहे त्यामुळे जर एमसीएने मुद्रांक शुल्क भरण्यास नकार दिला तर साडेतीन कोटी रुपयांची ही मुद्रांक शुल्काची रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम न भरल्यास करार रद्द करू असे आयुक्त सचिन ओंबासे सांगत आहे मात्र सध्या हा करार अस्तित्वात आहे त्यामुळे करार रद्द जरी करायचा असला तरीही साडेतीन कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावाच लागणार आहे. त्यामुळे पुण्यातील पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनी ज्याप्रमाणे 21 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी टाळाटाळ करत आहे तोच कित्ता आता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोलापुरात गिरवण्याचा प्रयत्न करीत आहे. मुद्रांक शुल्क कोणी भरावा याबाबत करार पत्रात काहीच उल्लेख नाही, त्यामुळे याचा नाहक भुर्दंड सोलापूर महापालिकेला बसणार आहे हे नक्की.

