पुणे : पुण्यात कोरोनाचा स्फोट झालेला पाहायला मिळतोय. काल एकाच दिवसात (बुधवारी) शहरात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येचा आकडा पाहता महापालिका प्रशासन मुळासकट हादरलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज एका विशेष बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत नवे निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
विशेष बैठकीचं आयोजन
काल दिवसभरात वाढलेल्या अडीच हजार रुग्णसंख्येनं प्रशासनानं धास्ती घेतली आहे. आज महापौर, शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी नवे निर्बंध काय असावेत, यावरती चर्चा होणार आहे. महापौर, महापालिका आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत.