बोलेरोमधून वाहतूक होणारी 500 लिटर हातभट्टी दारु जप्त..

0
23

राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची धडाकेबाज कारवाई

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर विभागाने 8 जून रोजी सकाळी बोलेरो वाहनातून पंढरपूर शहरात अवैधरीत्या विक्रीकरिता आणण्यात येणारी 500 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन रु. 4 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 जून पासून अवैध हातभट्टी ठिकाणे व त्या ठिकाणांपासून गावोगावी अवैधरीत्या वाहतूक केल्या जाणा-या हातभट्टी दारुविरोधात मोहिम सुरु केली आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक 8 जून रोजी रोजी गुप्त बातमीदारामार्फ़त मिळालेल्या बातमीनुसार निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क,पंढरपूर यांनी त्यांचे पथकासह पंढरपूर शहरातील सरगम टाकिज जवळ सापळा लावून महिंद्रा बोलेरो क्र. MH-45-A-8015 हे वाहन अडवून त्याची तपासणी केली असता वाहनामध्ये हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण 9 रबरी ट्युब मिळून आल्या. या कारवाईत 25 हजार रुपये किंमतीच्या 500 लिटर हातभट्टी दारु व वाहनासह एकूण रु. 4 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे रमेश गोपीचंद राठोड, रा. बोरडेगाव, वडजी तांडा, ता. दक्षिण सोलापूर याला अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीची सखोल चोकशी केली असता त्याने हातभट्टी दारु दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी तांड्यावरुन पंढरपूर शहरात विक्रीकरिता आणत असल्याचे तपासादरम्यान सांगितले.

सदरची कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप, विभागीय उपआयुक्त पुणे विभाग श्री अनिल चासकर , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पी.ए.मुळे निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, पंढरपूर, श्री मुढे, सहायक दुय्यम निरीक्षक व जवान गणेश रोडे यांच्या पथकाने पार पाडली. तसेच एका अन्य कारवाईत निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ विभाग व भरारी पथक सोलापूर यांनी सोलापूर शहरातील विजापूर रोड वरील नेहरु नगर परिसरात 7 जून रोजी रात्री 8 चे सुमारास धाड टाकून ममता शिवाजी राठोड या महिलेच्या ताब्यातून 20 हजार 500 रुपये किंमतीची 400 लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. सदर महिलेविरुद्ध हातभट्टी दारु बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देश्याने बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 जून ते 8 जून या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण 28 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यात 3710 लिटर हातभट्टी दारु, 18 लिटर देशी दारु, 11 लिटर विदेशी दारु, 4800 लिटर गुळमिश्रित रसायन व 175 लिटर ताडी जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालात 3 चारचाकी वाहन व 3 दुचाकी वाहनांचा समावेश असून मुद्देमालाची किंमत रु. 17 लाख़ 18 हजार इतकी आहे.