पालखी मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण उर्वरित कामेही विहित वेळेत पूर्ण करणार – जिल्हाधिकारी

0
21

सोलापूर : पालखी महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणामुळे पालखी मार्गावरील विसावा ठिकाणे, रिंगण सोहळ्याची ठिकाणे, मुक्कामाची ठिकाणे थोड्या प्रमाणात बदलणार आहेत. जिल्ह्यातील पालखी मार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामेही वेळेआधी पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

पालख्यांच्या रिंगण सोहळ्यास जागा कमी पडत असल्याने काही ठिकाणात बदल करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायाच्या व पालखी सोहळ्याच्या सर्व प्रथा परंपरा जपण्यासाठी सोहळा प्रमुखांबरोबर प्रशासनाने पालखी मार्गाची पाहणी करून सुचवलेल्या ठिकाणी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.

नवीन पालखी महामार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येते. मौजे धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा जिल्ह्यात प्रवेश होतो. याठिकाणीच पालखीचे स्वागत करण्यात येते. धर्मपुरी ते पंढरपूर हे अंतर 80 किलोमीटर आहे. संत तुकाराम महाराज पालखीचा अकलूज (ता. माळशिरस) येथून जिल्हा प्रवेश होतो. अकलूज ते पंढरपूर 50 किमी अंतर आहे. धर्मपुरी येथे सध्या कॅनॉल लगत महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने स्वागत समारंभ कारुंडे विसावा येथे घेण्यात येणार आहे.

खडूस फाटा येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण सोहळा होत असून तेथील उड्डाणपूल आणि सर्विस रोडचे काम युद्धपातळीवर सुरू असून वारीपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. टप्पा येथे संत सोपानदेव महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा बंधूभेट सोहळा होत असून याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूला सर्विस रोड तयार करण्याचे काम सुरू आहे. हेही काम वारीपूर्वी करण्याचे नियोजन असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

वारकऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही

भंडीशेगाव ता. पंढरपूर येथील पालखी महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून वारीपूर्वी काम पूर्णत्वास येणार आहे. बाजीराव विहीर, भंडीशेगाव येथे उभे व गोल रिंगण होत असते. येथील जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने कोणतीही अडचण राहणार नाही.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अकलूज ते 25/4 फाटा तसेच 25/4 फाटा ते बोंडले येथील पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. येथील रस्ता वारीपूर्वी वाहने व वारकरी यांना जाण्या-येण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात योग्य करण्यात येणार असल्याची माहितीही शंभरकर यांनी यावेळी दिली.