31ऑगस्टपर्यंत प्रस्ताव द्या; विद्यापीठ बैठकीत डॉ. पाब्रेकर यांचे आवाहन
सोलापूर, दि.25- विद्यापीठे व महाविद्यालयांच्या पायाभूत सोयी सुविधा, विकास आणि संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (पीएमउषा) राबविण्यात येत असून या माध्यमातून विद्यापीठांसाठी शंभर व वीस कोटी तर महाविद्यालयांसाठी पाच कोटी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन या अभियानाच्या शासनाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियानाची माहिती देण्यासाठी प्राचार्य, विद्यापीठ, अधिकारी, संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. पाब्रेकर यांनी शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे आदी उपस्थित होते.
डॉ. पाब्रेकर म्हणाले की, विद्यापीठ व महाविद्यालयांना पूर्वी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) या योजनेतून संशोधन व विकासासाठी निधी मिळत असे. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान आणले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यार्थी विकास याची सांगड घालून या योजनेतून आता निधी मिळणार आहे. अनुदानित विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी ही योजना आहे. सुरुवातीला राज्यातील 36 पैकी 18 फोकस जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला निश्चित लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत, बांधकाम दुरुस्ती, फर्निचर, तांत्रिक साहित्य तसेच विविध संशोधन कार्यशाळेला प्रामुख्याने निधी मिळणार आहे. शासन स्तरावरील निवड समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पुढे केंद्र सरकारला शिफारस करणार आहे. यामध्ये गुणवत्तेला अतिशय महत्त्व देण्यात येणार आहे. तरी विद्यापीठ व महाविद्यालयांनी [email protected] या ईमेलवर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.