सोलापूर ; जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम सुरू केले आहे. सुरुवातीला त्यांनी मुख्यालयातील स्वच्छतेकडे लक्ष दिले असून त्या पद्धतीने सध्या जिल्हा परिषदेत कामकाज सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते.
आता त्यांनी लगेच प्रशासनात बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात स्वतःच्या कार्यालयापासून केली असून त्यांचे स्वीय सहाय्यक शिवानंद मघे यांची उचल बांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर दक्षिण पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक सुधाकर माने देशमुख यांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे. मगे यांच्या बदलीने जिल्हा परिषदेतील काही कामगार नेत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अविनाश गोडसे यांची बदली झाल्यानंतर त्या जागेवर काही महिने पूर्ण वेळ अधिकारी देण्यात आला नव्हता नंतर मात्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शिवानंद मगे यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या काळात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे सीईओ पदाचा पदभार होता तेव्हा त्यांनीही मगे यांच्या कामावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनातील पहिला दणका मगे यांच्यावर बसला आहे याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे.