मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मंत्रालयात तगडी सुरक्षाव्यवस्था असतानाही ही महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करताना तिकडे महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हती. त्यामुळे तोडफोड केल्यानंतर ही महिला पुरुष पोलिसांच्या देखत मंत्रालयातून सहजपणे निसटली होती. या प्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेतबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होण्यासोबतच एकप्रकारे पोलिसांचीही नाचक्की झाली होती. मात्र, आता पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. परंतु, पोलिसांनी या महिलेचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या या महिलेचे नाव गुलदस्त्यात का ठेवले जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गुरुवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. ही महिला पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून सचिवालय गेटने पुन्हा गेटपास न घेता आतमध्ये शिरली. त्यानंतर ही महिला सहाव्या मजल्यावरील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापाशी पोहोचली. यानंतर या महिलेने घोषणा देत फडणवीसांच्या कार्यालयावरील नेमप्लेट काढून फेकली. याठिकाणी लावण्यात आलेल्या शोभेच्या झाडांच्या कुंड्याही या महिलेने फेकून दिल्या. त्यानंतर ही महिला पोलिसांदेखत मंत्रालयातून निसटली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला. अखेर 18 तासांनी पोलिसांना या महिलेची ओळख पटवण्यात यश आले आहे. मात्र, तुर्तास पोलिसांनी या महिलेची ओळख उघड करण्यास नकार दिला आहे. ही घटना घडली त्यावेळी या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.