मसाप दक्षिण सोलापूर शाखेकडून आयोजित कार्यक्रमाला हुतात्मा स्मृती मंदिरात गर्दीच गर्दी
सोलापूर,(प्रतिनिधी)ः- सद्य परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या देशाचा दैदिप्यमान इतिहास शिकवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सद्य परिस्थिती या विषयावर ते बोलत होते.
ब्रिटीशांनी जातीचे विष पेरून तोडा आणि राज्य करा अशी निती वापरत आपल्या देशावर अनेक वर्ष राज्य केले, तीच परिस्थिती काहीजण निर्माण करीत आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासारख्या परखड हिंदुत्वाची सद्या देशाला गरज आहे. महाराष्ट्राला जातीचा शाप लागलेला आहे. प्रभु श्रीराम यांनी रामराज्य निर्माण केले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यावेळी त्यांनी कोणत्याच जाती धर्माचा विचार केला नाही.
हिंदु संस्कृतीमध्ये मनुष्यधर्माला महत्वाचे स्थान आहे. माणूस हा जन्मा पेक्षा त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो हाच विचार हिंदु धर्मामध्ये शिकवलेला आहे. आणि हाच दैदिप्यमान इतिहास आपल्या हिंदुस्थानचा आहे. अनेक महान राष्ट्रपुरूष आपल्या हिंदुस्थानमध्ये जन्मले त्यांचे कर्तुत्व आणि त्यांनी मांडलेला विचार आजच्या पिढीला आणि आजच्या समाजाला प्रेरणादायी आहे. सर्वसामान्य जनतेने मनावर घेतले तर राष्ट्राची जडण घडण चांगली होवू शकते. जगाचे कल्याण करायचे असेल तर हिंदुच ते करू शकतील. हिंदुचे हक्काचे ठिकाण हे हिंदुस्थान आहे. जपानी लोकांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. प्रत्येक हिंदुच्या मनात प्रखर राष्ट्रप्रेम असले पाहिजे. जगाच्या पाठीवर जन्मलेला हा प्रत्येक माणूस प्रथम हिंदुच असतो. प्रत्येकाने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वाचले पाहिजे आणि ते समजून घेतले पाहिजे असेही अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले. मराठी भाषेवर मोठे अतिक्रमण झाले आहे. ते काढण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे. भाषा शुध्दीकरण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले होते. असेही त्यांनी अनेक उदाहरणे देवून सांगितले. या कार्यक्रमाला सावरकर प्रेमींनी मोठी गर्दी करीत हुतात्मा स्मृती मंदिर तुडुंब भरले होते.
हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये गुरूवार दि. 26 सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुणे अभिनेते शरद पोंक्षे यांचे स्वागत कार्यकमाचे अतिथी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून करण्यात आले. त्यानंतर शहाजी पवार यांचा सत्कार मसापचे उपाध्यक्ष हास्यसम्राट दिपक देशपांडे यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रकाश मोकाशे यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर यांच्यासह पदाधिकारी आणि शहरातील अनेक मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.