शालेय विद्यार्थ्यांसाठी “प्रिसिजन पासवर्ड वाचन अभियान”
सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशन आणि युनिक फीचर्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, लिखाणाची आवड वाढावी, विचार करण्याची सवय लागावी यासाठी प्रिसिजनने हाती घेतलेला उपक्रम म्हणजे पासवर्ड वाचन अभियान. “पासवर्ड वाचन अभियानाचे” हे दुसरे वर्ष आहे.
पासवर्ड वाचन अभियान अंतर्गत या वर्षातील दुसरा अंक वाटपाचा कार्यक्रम दि ५ व ६ डिसेंबर रोजी पार पडला. या वेळेस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने या हा उपक्रम राबविण्यात आला. इंडियन नेव्ही मधून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले प्रवीण तुळपुळे ,युनिक फीचर्सच्या वृषाली जोगळेकर व सचिन घोडेस्वार यांनी जादूच्या माध्यमातून वाचनाचे महत्व विद्यर्थ्यांना पटवून दिले.वाचाल तर वाचाल हा मंत्र देऊन मुलांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जादूच्या कला, मुलांचा सहभाग घेऊन एकापेक्षा एक सुंदर जादूचे अनेक बहारदार कार्यक्रम करत करत त्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्याच बरोबर मागील पुस्तकावर आधारित मुलाखत उपक्रमांतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देऊन त्यांचा प्रिसिजनचे माधव देशपांडे ,प्रवीण तुळपुळे , युनिक फीचर्सच्या वृषाली जोगळेकर व सचिन घोडेस्वार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या अभियानात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सोनामाता प्रशाला, कमला नेहरू प्रशाला, जिल्हा परिषद शाळा बेलाटी, जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर बाळे, अरण येथील संत सावता माळी प्रशाला, मोहोळ शाळा नंबर 4, जिल्हा परिषद शाळा अरण, जिल्हा परिषद शाळा पापरी ता.मोहोळ या आठ शाळांमधील एक हजार विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले आहेत.