पुणे : राज्याच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने कोकण विभाग आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सध्या पाऊस होत आहे. हा पाऊस पुढील पाच ते सहा दिवस कमी-अधिक प्रमाणात कायम राहणार आहे. कोकण विभागात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात या काळात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मोठा पाऊस झाला. मुंबई, ठाण्यातही दोन दिवसांत जोरदार पावसाची नोंद झाली. आता अरबी समुद्र ते दक्षिण आंध्र किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. या दोन्ही स्थितींमुळे कोकण विभागात आणि त्या लगतच्या मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये दापोली, गुहागर, ठाणे, वसई आदी भागांमध्ये १०० ते १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत १८ जुलैला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. याच भागांत १९ ते २१ दरम्यान काही ठिकाणी मुसळधारांची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत १९ ते २१ जुलैदरम्यान काही भागांत मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाट क्षेत्रांमध्ये १८ ते २१ जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.