जिजामाता होत्या जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री
सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री होत्या, असे गौरवोद्गार श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी काढले.
सकल हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस गुरुवारी प्रारंभ झाला.
कथेच्या पहिल्यादिवशी ‘शिवजन्म पूर्वकाळ, तत्कालीन परिस्थिती ते शिवजन्म’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, छत्रपती श्री शिवरायांच्या जन्मापूर्वी मुघलांनी भारतातील अनेक हिंदू साम्राज्ये उध्वस्त करून अनन्वित अत्याचार केले. मुघलांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, आपसातील भांडणे आणि त्यातून भारतासमोर निर्माण होणाऱ्या समस्या मातोश्री जिजामाता पाहत होत्या. ही परिस्थिती पालटून टाकावी अशी शहाजी महाराज आणि जिजामाता यांची मनोमन इच्छा होती. ही इच्छा उराशी घेऊनच जिजामातांनी छत्रपती श्री शिवरायांना जन्म दिला. जिजामातांच्या अंत:करणातील भगवदभक्तीप्रमाणे सध्याच्या महिला भगिनींनीही देव, देश, धर्माबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले. यावेळी समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी शिवजन्माचा प्रसंग सादर केला.श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख सी. ए. राजगोपाल मिणियार यांनी प्रास्ताविक तर गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी सूत्रसंचालन केले.
सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या दुसऱ्या दिवशी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी ‘ शिवसंस्कार ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही अंश उलगडून दाखवणार आहेत. त्याकरिता सोलापूरकरांनी दुपारी ४ वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.