सोलापूर : यंदाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राजेंद्र माने होते. उपायुक्त डॉ दिपाली काळे, उपायुक्त विजय कबाडे, मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त राजा सरवदे, राजा इंगळे, राहुल सरवदे, सुबोध वाघमोडे, अजित बनसोडे, उत्सव अध्यक्ष शिवम सोनकांबळे, कार्याध्यक्ष वैशाली उबाळे मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, विश्वस्त आनंद चंदनशिवे, सचिव केरू जाधव, उपाध्यक्ष रविकांत कोळेकर, मिलिंद प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष सुहास सावंत, कार्याध्यक्ष रसूल पठाण, रॉकी बंगाळे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आंबेडकरी नेत्यांमध्ये दोन गट तयार झाले. त्यानंतर झालेल्या बैठकीत डॉल्बी लावण्यावरून पोलीस आयुक्तालयात गोंधळ उडाला. दोन्ही गट बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले होते. त्यामुळे यंदाच्या बैठकीत काय होणार अशी चर्चा होती. परंतु या बैठकीत मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावण्याचा विषय कोणाच्याही तोंडून आला नाही. प्रत्येकाने ही मिरवणूक शांततेत, उत्साहात व पोलीस प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने पार पाडवी अशा सूचना केल्या.
मागील मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तशी काळजी घ्यावी, जयंती उत्सव काळात दारूबंदी सप्ताह पाळावा, 14 एप्रिल रोजी अभिवादनाला येणाऱ्या महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू ठेवावी, जयंती उत्सव काळात सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ देऊ नये, मिरवणूक मार्गावर लाईट सुरू ठेवाव्यात, मिरवणुकीतील काही वाहनांना फॉरेस्ट मार्गे न जाता डफरीन चौकातून महापौर निवास या मार्गावर जाण्यास परवानगी द्यावी अशा सूचना समोर आल्या.
पोलीस आयुक्त माने म्हणाले, शांतता समितीची बैठक घेण्यामागील केवळ हेतू हाच आहे की उत्सव शांतते पार पडावा, आपण केलेल्या अनेक सूचना महापालिकेसाठी आहेत. पोलीस प्रशासन आपली भूमिका जबाबदारीने पार पाडेल. घातपात होऊ नये, कोणताही अपघात होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.