निवेदकाच्या कौशल्यानेच कार्यक्रमाचा दर्जा वाढतो – अभिनेते विजय गोखले

0
26

सर जॉन येवलेकर उत्कृष्ठ निवेदक पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर,(प्रतिनिधी):- दृष्टी आणि दृश्य यातील खिडकी म्हणजेच निवेदक आणि संग प्रसंग यातील धडकी म्हणजे निवेदक, निवेदकाच्या कौशल्यानेच कार्यक्रमाचा दर्जा वाढतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी केले. सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर जॉन येवलेकर उत्कृष्ठ निवेदक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी हॉटेल बालाजी सरोवर येथे त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दि फर्स्ट चर्चचे धर्मगुरू रेव्ह.विकास रणशिंगे, एचसीसी चर्चचे धर्मगुरू रेव्ह.ईमान्युएल म्हेत्रे, ताराबाई येवलेकर, तेजश्री येवलेकर, मंजुश्री येवलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रसिध्द अभिनेते, निवेदक विघ्नेश जोशी, सोलापूरच्या मंजुषा गाडगीळ, शीला अडसूळे कांबळे यांना सर जॉन येवलेकर उत्कृष्ठ राज्यस्तरीय निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विजय गोखले यांनी सर जॉन येवलेकर यांच्याबाबतच्या आठवणी सांगितल्या, तसेच निवेदक हा अभ्यासू, वाचक आणि हरहुन्नरी असला पाहिजे तरच त्या कार्यक्रमाचा दर्जा वाढतो असेही ते म्हणाले.

प्रारंभी ईशस्तवन करण्यात आले. त्यानंतर प्रतिष्ठानच्या सचिवा रूपश्री येवलेकर यांनी प्रास्ताविक करीत सर जॉन येवलेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम दरवर्षी करण्यात येतो, शब्द आणि भाषांवर प्रभुत्व असलेले जॉन येवलेकर यांच्याकडून लहापणापासूनच बरेच काही शिकायला मिळाले त्यांच्या निवेदनातून प्रेरणा घेवून अनेकांनी आपले करीअर निवेदक म्हणून सुरू केले असेही रूपश्री येवलेकर यांनी सांगितले. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष फिलिप नदवी यांनी केले. त्यांनतर यंदाचा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देताना निवेदकांना पुरस्कार मिळत नाही परंतु येवलेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती कसर भरून निघाली असे शीला अडसूळे कांबळे यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले तर निवेदक होण्यासाठी मोठे परिश्रम आणि घरातून प्रतिसाद मिळावा लागतो आणि तो मला मिळाला असे मंजुषा गाडगीळ यांनी व्यक्त केले तर विघ्नेश जोशी यांनी निवेदक हा निर्मळ मनाचा असला पाहिजे जॉन येवलेकर हे यांच्या आयुष्यात त्यांनी अनेकांना सभागृहात खिळवून ठेवल्याचे एैकले आहे. त्यांच्या निवेदन कौशल्याचे अनेक किस्से एैकले कार्यक्रम मनोरंजनात्मक होण्यासाठीच निवेदक प्रयत्नशील असतो असेही विघ्नेश जोशी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका शोभा बोल्ली यांनी केले तर आभार तेजश्री येवलेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉन येवलेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष फिलीप नदवी, सचिवा रूपश्री येवलेकर, उपाध्यक्ष शशिकुमार तेलंग, सहसचिव मंजुश्री येवलेकर, खजिनदार तेजश्री येवलेकर, सदस्य किरणकुमार इरनाळे, मायकल नदवी यांनी विशेष परिश्रम घेतले. तब्बल तीन तास सुरू असलेला हा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार आणि नीटनेटका झाला. रंगमंचाची सजावट गुरू वठारे आणि किशोर रच्चा यांनी केली. या कार्यक्रमासाठी उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, डॉ. श्रीकांत येळेगांवकर, शंकर पाटील, दादा साळुंखे, प्रशांत बडवे, आदी मान्यवंराची मोठी गर्दी होती.