लोकमंगलच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर : विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या विषयाचे ज्ञान देण्याबरोबरच कसे जगावे याचेही ज्ञान देण्याची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी व्यक्त केले.
लोकमंगल सहकारी पतसंस्था आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या शिक्षकरत्न पुरस्कारांचे वितरण करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात 11 शिक्षक आणि दोन जिल्हा परिषद शाळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चार हजार रुपयांची पुस्तके आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुभाष देशमुख होते.
पुढे बोलताना प्रा. अडसूळ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भविष्य घडविणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांतील चेतना जागृत करून देशाला अधिक बळकट करण्यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आ. देशमुख म्हणाले की, गुरुजनांमध्ये देश समृद्ध करण्याची ताकत आहे. शिक्षणासोबेतच समाज आर्थिक उन्नत व्हावा यासाठी शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर द्यावा.
यावेळी आदर्श शाळा पुरस्कार होटगी (ता. दक्षिण सोलापूर) आणि गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना देण्यात आला. कर्तबगार व्यक्तीच्या शिक्षकाला देण्यात येणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार अंकोली येथील राहुल देशपांडे यांच्या शिक्षिका हरिभाई देवकरण प्रशालेतील निवृत्त शिक्षिका विद्या लिमये यांना देण्यात आला. नवोपक्रमशील शिक्षकासाठीचा पुरस्कार माळशिरस तालुक्यातील ताम्हणे वस्तीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महेश गायकवाड यांना, आदर्श कला शिक्षक म्हणून सांगोला येथील प्रमोद डोंबे यांना, विशेष शिक्षक पुरस्कार सोलापूरच्या राधा किसन फोमरा मूकबधीर विद्यालयाच्या मुख्यध्यापिका क्षितिजा गाताडे यांना, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी असलेल्या पुरस्कारासाठी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विरभद्र चनबस दंडे यांना देण्यात आला. यावेळी डॉक्टर ह. ना. जगताप आणि पुरस्कार निवड समितीचे सदस्य, लोकमंगल फाउंडेशन चे मान्यवर व लोकमंगल पतसंस्थेचे संचालक यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
उर्वरित पुरस्कार पुढीलप्रमाणेः
प्राथमिक :- 1) प्रिया सुरवसे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलाटी), ज्योती कलुबर्मे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर, ता. मंगळवेढा), माध्यमिक मारुती शहाणे (हरिभाई देवकरण प्रशाला), अब्दुल कादर ईसाक शेख (न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर, ता. दक्षिण सोलापूर.) शिवाजी व्हनकडे ( नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला, माधव नगर, सोलापूर) कनिष्ठ महाविद्यालय:- 1) प्रा. धनाजी भानुदास चव्हाण (सांगोला विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज, सांगोला)