लिव्ह इन रिलेशनमध्ये जन्मलेला मुलगाही वडिलांच्या संपत्तीत हक्कदार : सर्वोच्च न्यायालय

0
12

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना विवाहाशिवाय जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत हक्क असल्याचे मानले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देताना केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नव्हते. कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हते. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे (live in relationship) दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देताना स्पष्ट केले. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क आहे.