सोलापूर : सोलापुरमध्ये उन्हाच्या कडाक्याने नागरिक त्रासले आहेत. या सोबत अचानक चक्कर येणे, नाकातून रक्त येणे असे प्रकार होऊ लागले आहे. जिल्हाभरात एकूण १४ जणांना उष्माघात झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात उन्हाचा कडाका खूप अधिक वाढला आहे. काही दिवसात तापमानाने मोठा जोर लावला आहे. यावर्षी उन्हाळ्यात ४३.७ अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. या शिवाय उन्हाचा त्रास असह्य झाल्याने ताप येण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुपारी १२ ते ५ कालावधीत शक्यतो घराबाहेर उन्हात जाण्याचे टाळावे, फारच आवश्यक असल्यास योग्य त्या उपाययोजना करून बाहेर जावे, असा सल्ला आरोग्य खात्याने दिला आहे.
उष्माघाताची लक्षणे
- मळमळ होणे
- ताप येणे
- उलटी होणे
- अचानक निरुत्साह वाटणे
- चक्कर येणे
उष्माघात झाल्यास हे करा
- सर्व अंग थंड पाण्याने पुसून घ्यावे. कुलर किंवा पंख्याखाली झोपवावे डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी चक्कर आल्यास हातापायांचे तळवे चोळावेत.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील विशेष उष्माघात उपचार कक्ष सुरू करण्यात आले आहेत. काही लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तत्काळ या कक्षात जाऊन उपचार घ्यावेत.
- डॉ. मनोज शेगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
उन्हात दुपारी १२ ते ४ या कालावधीत फिरू नये. बाहेर पडताना रुमाल, टोपी डोक्यावर असावी. सैल सुती कपडे वापरावेत. भरपूर पाणी, शरबत व ताक प्यावे. चहा, कॉफी टाळावी. मांसाहार व मद्यपान करू नये.