‘त्या’ मुलीच्या आई-वडिलांना महापालिकेने दिली चार लाखाची मदत

0
17
  • सोलापूर : नई जिंदगी परिसरात प्रभाकर नगरात नव्या पथदिव्यातून विजेचा धक्का बसल्याने सात वर्षाच्या ऐमन बिराजदार हिचा मृत्यू झाला. यातील कुटुंबीयास आर्थिक मदत म्हणून महापालिकेच्या माध्यमातून मयत मुलीच्या वडिलांना आयुक्त शितल तेली – उगले यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
  • नई जिंदगी परिसरात प्रभाकर नगरात महापालिकेकडून पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचा मक्ता ईईएसएल कंपनीस दिला आहे. लाेखंडी खांबावर स्वीच बॉक्स बसविला. त्याच बॉक्समधील सर्व्हिस वायर चुकीच्या पध्दतीने बसविण्यात आल्याने नव्या पथदिव्यातून विजेचा धक्का बसल्याने सात वर्षाच्या ऐमन बिराजदार हिचा मृत्यू झाला. दरम्यान या याप्रकरणी संबंधित कुटुंबीयास माणुसकीच्या दृष्टिकोनातून तत्काळ मदत करणे गरजेचे आहे यासाठी महापालिकेच्या स्तरावर तत्काळ मदत करण्याचे नियोजन महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार करण्यात आले.
  • आयुक्त यांच्या कार्यालयात आज मयत मुलीचे वडील बंदेनवाज बिराजदार यांच्याकडे चार लाख रुपयाचा धनादेश महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी आदी उपस्थित होते.
  • पथदिव्याच्या स्वीच बॉक्समधील फिटिंगच्या सदोष सर्व्हिस वायरमुळेच मुलीला शॉक लागल्याचे विद्युत निरीक्षकांच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ईईएसएल कंपनी दोषी ठरणार आहे. यामुळे ईईएसएल या कंपनीच्या बिलातून चार लाख रुपये कपात करून ही आर्थिक मदत संबंधित कुटुंबास करण्यात आली आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, अशी भावना महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी यावेळी व्यक्त केली.
  • महावितरण कंपनीच्या मेमोरंडमनुसार अशा अपघात प्रकरणी दोन ते चार लाखापर्यंतची नुकसान भरपाई देय राहील, असे नमूद केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नैसर्गिक आपत्ती  नियमानुसार 4 लाखापर्यंतची मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. नियमानुसार अधिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी स्पष्ट केले.
  • अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेण्याकरिता संबंधित ईईएसएल या कंपनीला सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नगरपरिषद संचालनालय यांनाही याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्याचे सूचना देण्यात आल्या असल्याचेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी स्पष्ट केले.