जीवनावश्यक वस्तू मात्र सात ते अकरापर्यंत
येस न्युज मराठी नेटवर्क (गिरीष गोरे): विदेशी मद्य , देशी मद्य ,सौम्य बिअर आणि वाइन सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सीलबंद बाटलीतून घरपोच विकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र दूध किराणा भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू मात्र सकाळी सात ते अकरा पर्यंत विकण्यासाठी परवानगी दिलेली आहे. याचा अर्थ जीवनावश्यक खाद्यपदार्थ दूध यापेक्षाही मद्यविक्री ही अधिक जीवनावश्यक असल्याचे राज्य सरकारला वाटत असावे. त्यामुळे मध्य विक्रीतून मिळणारा महसूल सोडण्यास राज्य सरकार सध्यातरी तयार नसल्याचे चित्र आहे. या साऱ्या बाबतचे राजकारण आणि पैशांची देव-घेव याबाबत माहिती घेतली असता सर्वच बियर बार आणि रेस्टॉरंट धारक ज्यादा किंमत लावून सध्या किरकोळ मध्ये विकत असल्याचे दिसून आले. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. कारण आमच्या हप्ता योग्य त्या यंत्रणेद्वारे वरिष्ठांना पोहोच झाला आहे, असेही एका मद्य विक्रेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी 21 एप्रिल रोजी विक्रीबाबत नवीन आदेश काढला असून तीस तारखेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.