सोलापूर, दि.२१- भुवनेश्वर ओरिसा येथे दि.१५ जून २०२३ रोजी संपन्न झालेल्या भारतीय विश्वविद्यालय संघ (AIU) आयोजित जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत हाफ मॅरेथॉन (रोड रेस) या प्रकारामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या अरुण धनसिंग राठोड या विद्यार्थी खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याने 1 तास 06 मिनिटे 44 सेकंद इतकी वेळ पूर्ण करून जागतिक स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक विभागाची ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे.
जागतिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याची १ तास १० मिनीटाची वेळ होती. भुवनेश्वर येथे झालेल्या निवड चाचणीत अरूण राठोड याने २१ किलोमीटरचे अंतर १ तास ६ मिनीटे व ४४ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावत जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.आता चीनमध्ये २८ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या जागतिक स्पर्धेत हा खेळाडू सहभागी होणार आहे. अरूण राठोड यांच्यासोबत भुवनेश्वर येथे चाचणीसाठी संघव्यवस्थापक म्हणून डॉ. किरण चोकाककर तर प्रशिक्षक म्हणून डॉ. अशोक पाटील होते.
या यशाबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांनी अभिनंदन करून खेळाडू अरूण राठोड, संघव्यवस्थापक डॉ. किरण चोकाककर, प्रशिक्षक डॉ. अशोक पाटील यांचा सत्कार केला. या विद्यार्थी खेळाडूला चीनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी विद्यापीठाच्यावतीने दिल्या जातील, असे कुलगुरू यांनी सांगितले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनीही अभिनंदन केले.
याप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, सचिन गायकवाड, विद्यापीठाचे क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, माजी संचालक डॉ. सुरेश पवार उपस्थित होते.