वन, सामाजिक वनीकरण विभागामार्फत पालखी मार्गात बीज गोळ्याचे वाटप होणार

0
24

बीज गोळे अंकुरीत करूया पालखी मार्ग हरित करूया

सोलापूर : बीज गोळे अंकुरीत करूया पालखी मार्ग हरित करूया” या घोषवाक्यानुसार आळंदी ते पंढरपूर या पालखी प्रस्थान कार्यक्रमादरम्यान माळशिरस, खुडूस येथे 5 ते 6 जुलै 2022 च्या दरम्यान पालखीबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत बीज गोळ्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

        आळंदीपासून सुरू होणाऱ्या वारीमध्ये वन कर्मचारी संजय भोईटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन सुरूवात केलेली असून वारकऱ्यांना बीज गोळ्याचे वाटप केलेले आहे. बीज गोळे हे स्थानिक प्रजातीच्या बियापासून तयार केले आहेत. वारकरी हे बीज गोळे सोबत घेऊन जाऊ शकतात. वारकऱ्यांनी वारीच्या प्रवासाच्या दरम्यान पालखी मार्गावर बीज गोळे फेकले असता पावसाळ्यात नवीन वृक्षसंपदा तयार करणे कामी सक्रीय सहभाग व मोलाचा वाटा वारकऱ्यांकडून मिळेल. बीज गोळ्यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे म्हणजेच कडूनिंब, अंजन खैर, शिसू यांचे बीज वापरलेले आहेत.

याचबरोबर वन, सामाजिक वनीकरण विभागामार्फत वारकऱ्यांना तुळशीच्या विविध प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. या वर्षाची वारी ही “हरित वारी करण्याचा विचार व संकल्पना राबविली जात आहे. या मध्ये 95 माय एफएम यांनी देखील सहभाग नोंदविलेला आहे. यामध्ये राज्यातून जमा होणारी तुळशीची रोपे वनविभाग आणि 95 माय एफएम यांच्यातर्फे वारकऱ्यांना तुळशी वृंदावन पंढरपूर, खुडूस, माळशिरस येथे वारीच्या निमित्ताने वाटप केली जाणार आहेत.

        बीजगोळे हे 5 जून पर्यावरण दिन यादिवशी संगमेश्वर कॉलेज सोलापूर व इतर स्वयंसेवी संस्था, निसर्ग पर्यावरण मित्र यांनी तयार केले आहेत. बीजगोळे हे जैविक विघटनशील पिशवीमधून वाटप करण्यात येणार आहेत.