सोलापूर, (प्रतिनिधी)ः- मन शरीर आणि प्राणाची शुध्दता महत्वाची आहे त्याचबरोबर आपल्यातील अहंकाराचा त्याग केल्यास पूर्णयोगातील अंतरंगाची साधना होते असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विवेकाची अमृतवाणी मधील दिपावलीपूर्व निरूपणाचे दुसर्या दिवशी पूर्णयोग – अंतरंग साधना या विषयावर ते बोलत होते.
ध्येयासाठी जोडणे म्हणजेच अभिप्सा. योगी अरविंद यांनी सांगितलेले पूर्णयोगात निरपेक्ष कर्म हेच सेवाभाव आहे. आत्मशांतीसाठी मानवाने सदैव तयार असले पाहिजे. पंच प्राणाचा विकास हाच सृष्टीचा विकास असल्याचेही अरविंद यांनी सांगून पूर्णयोगातील अंतरंगाची साधना केली आहे असेही निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी सांगितले.
अंतरंग साधना… जे साधत नाही ते साधण्याचा प्रयत्न म्हणजे साधना, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आशय सर्वांपर्यंत पोहोचवणे हे काम अवघडच, जीवनाला परिपूर्णता आणण्यासाठी काय करावे लागेल?
अस्तित्वाचा कण शुद्ध व्हायला हवा तर आज आत्ता इथे वर्तमानात जगावे लागेल, ईश्वर तर आहेच, पण त्याच्याशी नाते कसे दृढ करायचे ,ती शिकवण म्हणजे अंतरंग साधना, देवाशी सख्ख्य ,देवाशी संवाद, शरणागती, पंचकोशातून आनंदमय कोषाकडचा प्रवास हे सारे सांगताना सोपी उदाहरणे देत सांगणे व मधूनच थोडीशी मिश्किली ,जाता जाता सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे भान आणून देणे हेही गरजेचे, ती आजच्या वर्तमान काळाची गरज. लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) मध्ये आयोजित या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला सकाळी 6.25 वाजता सुरूवात करण्यात आली प्रारंभी शंखनादामध्ये निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे मंचावर आगमन झाले.
त्यानंतर पु ना गाडगीळ या प्रसिध्द सराफ पेढीचे सोलापूरचे व्यवस्थापक जितेंद्र जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून विवेक घळसासी यांचे स्वागत केले त्यानंतर निरूपणाला प्रारंभ करण्यात आला. पूर्णयोग – अंतरंग साधना या विषयावर त्यांनी एक तास निरूपण केले. दुसर्या दिवशीच्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. रविवार 27 ऑक्टोंबर रोजी पूर्णयोगातील गतिरोध या विषयावर निरूपण करून यंदाच्या वर्षीच्या दिपावलीपूर्व विवेकाच्या अमृतवाणीचा समारोप करण्यात येणार आहे. रसिक श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले.