सोलापूर विद्यापीठाचा परिसर पाहून सेवानिवृत्त प्राध्यापक, अधिकारी भारावले!

0
11


25 जणांनी दिली भेट; प्रगतीबद्दल व्यक्त केला आनंद!

सोलापूर, दि.13- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास सोलापूर शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. निसर्ग सौंदर्याने नटलेला विद्यापीठाचा सुंदर कॅम्पस पाहून यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक व अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. परिसर व विद्यापीठाची प्रगती पाहून खूपच भारावल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

सोलापूर शहरातील साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून 25 जणांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन विविध विभागांची माहिती जाणून घेतली. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. एम. बी. चव्हाण यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याचे गौरवोद्गार काढत सोलापूर विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर झाल्याचे सांगितले. निवृत्त ट्रेझरी अधिकारी जगदीश नाईक यांनीही कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने चांगली प्रगती केल्याचे आज दिसून येते, असे विशद केले. प्रा. विलास मोरे,गोविंद काळे, प्रा. आर. एच. शेख, शंकर करजगी, मोहन गोरे, लता मोरे आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त करीत विद्यापीठाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी या 25 सदस्यांना विद्यापीठाची माहितीपट दाखवून विविध विभागाची माहिती देण्यात आली.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सेवानिवृत्त प्राध्यापक व अधिकाऱ्यांनी विद्यापीठास भेट दिल्यामुळे आनंद झाल्याचे सांगत असे उपक्रम होणे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. या माध्यमातून समाजातील वातावरण तसेच अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनामुळे विकास होण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रभारी कुलसचिव डॉ. पवार यांनी आभार मानले.