मोहरम च्या मिरवणुकीत मध्ये दोन युवकांमध्ये राडा; पोलिसांचा सौम्य लाठीमार

0
39

कोल्हापूर (सुधीर गोखले ) – जिल्ह्यातील हातकणंगले मध्ये काल संध्यकाळी उशिरा मोहरम सणानिमित्त निघालेल्या ताबूत विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन युवकांमध्ये वादावादी झाली त्याचे रूपांतर मारामारीमध्ये झाले तर पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हस्तक्षेप करत गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला यामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ निर्माण झाला. सैरभैर झालेल्या जमावाच्या चेंगराचेंगरीत अनेक महिला, वयोवृद्ध व लहान मुले जखमी झाली, तर पोलिसांच्या लाठीमारात काही कार्यकर्ते जखमी झाले.  दरम्यान, लाठीमाराचे आदेश नसतानाही काही पोलिस कर्मचाऱ्यां‍नी जाणीवपूर्वक लाठीमार केल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्या‍वर कारवाई झाल्याशिवाय ताबूत विसर्जन न करण्याचा निर्णय घेत बाबूजमाल तालमीच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात सवाऱ्यांसह ठिय्या मारल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. त्यामुळे घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अखेरीस या घटनेची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिल्यानंतर जमाव शांत होऊन ताबुतांचे रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. हातकणंगलेतील मोहरममध्ये दोन तालमींमध्ये नेहमीच वर्चस्व वादाची लढाई सुरू असते. मात्र, आजवरच्या इतिहासात कधीच लाठीमारापर्यंत प्रसंग घडला नाही.गेल्या काही दिवसांपासून दोन्ही तालमींच्या काही कार्यकर्त्याकडून व्हॉटसॲप स्टेटस्‌ ठेवल्यावरून वाद धुमसत होता. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही तालमींची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. काल सायंकाळी येथील दर्ग्यातून ताबूत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी दोन युवकांच्यात वाद सुरू झाला. हे समजताच हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले.काही पोलिस कर्मचाऱ्यां‍नी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता थेट लाठीमार सुरू केला. यामुळे जमाव सैरभैर झाला.

यात अनेकजण जखमी झाले. यामुळे बाबूजमाल तालमीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी लाठीमार का केला, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही झाल्याशिवाय विसर्जन न करण्याचा निर्णय घेत सवाऱ्यासह ठिय्या मारला.घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी साळुंखे, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रवींद्र भोसले आणि सहकाऱ्यां‍नी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेरीस तालमीचे पदाधिकारी व पोलिस यांच्यात चर्चा होऊन त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. नियमांचे उल्लंघन केल्याने मोहरम मिरवणुकीत १५ जणांवर गुन्हेमोहरमच्या पंजा भेटीसाठी निघालेल्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपकाचा वापर करणे, नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ध्वनिक्षेपकाचे मालक, ट्रॅक्टरचालक यांचा समावेश आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिली.