मुंबई — प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीचा आज पुन्हा एकदा गौरव झाला. मुंबईतील मोतीलाल ओसवाल टॉवर येथे पार पडलेल्या “रोटरी नॅशनल सीएसआर अवॉर्ड” सोहळ्यात प्रिसिजनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात आलेल्या दोन प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले.
प्रिसिजनने ज्ञानप्रबोधिनीच्या एका अनोख्या प्रकल्पाला आपला सीएसआर निधी उपलब्ध करून दिला. ज्ञान प्रबोधिनीने “मुक्ती प्रकल्पा”च्या माध्यमातून बिडी कामगार महिलांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिला, तंबाखूच्या दुष्परिणामांपासून त्यांचे आरोग्य आणि जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाईचे काम उपलब्ध करून दिले. आजवर ६० हून अधिक महिला बिडी वळण्याच्या कामापासून मुक्त होऊन नवा आरोग्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण व्यवसाय करत आहेत. या उपक्रमाला प्रिसिजनच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून मोलाचा हातभार आहे.

दुसरा पुरस्कार कम्युनिटी ॲण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या क्षेत्रासाठी केलेल्या एकंदर योगदानाबद्दल देण्यात आला. या भव्य दिव्य अशा पुरस्कार प्रदान सोहळ्यात सुप्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ मोतीलाल ओसवाल, अभिनेते आणि समाजसेवक सोनू सूद, तसेच रोटरीचे मनिष मोटवानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रिसिजन कंपनीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन मा. यतिन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या सामाजिक जाणिवेतून, दूरदृष्टीतून आणि तळमळीतून हे उपक्रम साकार झाले आहेत. शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास आणि सामाजिक संस्थांच्या बळकटीकरणासाठी प्रिसिजन नेहमीच कटिबद्ध राहिली आहे. सामाजिक उत्तरदायित्व ही संकल्पना कॉर्पोरेट क्षेत्रात २०१३ पासून आलेली असली तरी प्रिसिजनने मात्र २००६ पासूनच आपल्या प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला होता. सोलापूर जिल्हयातील अनेक सामाजिक आणि आर्थिक बळकटीकरणाचे प्रकल्प प्रिसिजनच्या माध्यमातून उभे आहेत.
कंपनीच्यावतीने हे पुरस्कार स्वीकारताना “सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा अभिमान” व्यक्त करण्यात आला.